मणिपूर विधानसभेत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आतापर्यंत सरकारमध्ये असलेल्या, मात्र निवडणूक स्वतंत्र लढलेल्या दोन पक्षांना भाजप सोबत घेणार, की स्वत:च सत्तेचा सोपान चढणार याबाबत उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे हेनगांग मतदारसंघात त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी पी. शरतचंद्र सिंह यांचा १८,२७१ मतांनी पराभव करून निवडून आले.
६० सदस्यांच्या विधानसभेच्या ३२ जागा जिंकत भाजपने बहुमत मिळवले आहे, जनता दल (संयुक्त) पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल किंवा बहुमतासाठी आवश्यक असलेले निम्म्याहून अधिक संख्याबळ गाठेल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांत व्यक्त करण्यात आला होता.
गेल्या निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर येण्यापूर्वी राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला या वेळी फक्त ५ जागा जिंकता आल्या आहेत. त्याच्या विजयी उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंह यांचा समावेश आहे.
संख्याबळात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी)७ जागा जिंकल्या आहेत. नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) या पक्षाने ५ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांची भाजपशी निवडणूकपूर्व युती नसली, तरी ते दोघेही सत्ताधारी आघाडीचा भाग होते. अपक्ष उमेदवार २ जागांवर विजयी झाले असून, एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने आघाडी घेतली आहे.
आतापर्यंत मोजल्या गेलेल्या मतांपैकी भाजपने ३७.७५ टक्के मते मिळवली आहेत, तर मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टी १७.३० टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वीचे दुसरे स्थान गमावलेल्या काँग्रेसला १६.८४ टक्के मते मिळाली असून टक्केवारीत त्याचा तिसरा क्रमांक आहे
या निवडणुकीत काँग्रेस, ४ डावे पक्ष आणि जनता दल (एस) यांनी ‘मणिपूर प्रोग्रेसिव्ह सेक्युलर अलायन्स’ स्थापन करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला लढत दिली होती.
काँग्रेसने ६० पैकी ५३ जागा लढवून इतर जागा आघाडीतील इतर पक्षांना दिल्या होत्या. भाजपने सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले होते.
२०१७ सालच्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीमुळे ईशान्य भारतातील सत्तासमीकरणाने मोठे वळण घेतले होते. त्या वेळी काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपने २१ जागा जिंकल्या होत्या.
एनपीपी व एनपीएफ (प्रत्येकी ४ जागा), लोकजनशक्ती पार्टीचा १ आमदार व १ अपक्ष यांना सोबत घेऊन एकूण ३१ च्या संख्याबळावर भाजपने एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. इतर पक्षांतून आलेल्या आमदारांच्या भरवशावर भाजपचे संख्याबळ नंतर २८ पर्यंत वाढले होते.
मुख्यमंत्री बिरेन सिंह पाचव्यांदा विजयी
२० वर्षांपूर्वी राजकारणात आलेले आणि आता पाचव्यांदा आमदार झालेले एन. बिरेन सिंह हे पूर्वी फुटबॉलपटू राहिलेले असून, त्यांनी पत्रकार म्हणून काम पाहिलेले आहे. मणिपूरमध्ये भाजपचे यशस्वी नेतृत्व करून त्यांनी पक्षाला सलग दुसऱ्या वेळी सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आणले आहे. या राज्यात गेल्या पाच वर्षांत आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत शांतता प्रस्थापित करण्याचे आणि खोरे व पर्वतीय भाग येथील लोकांमधील दरी मिटवण्याचे श्रेय ६१ वर्षांचे बिरेन सिंह यांना दिले जाते. पूर्वी फुटबॉलचे खेळाडू असलेले बिरेन सिंह नंतर ‘नाहरलोगी थोडांग’ या भाषिक वृत्तपत्राचे संपादक बनले. बंडखोरीकडे आकर्षित होणाऱ्या युवकांना ‘स्टार्ट अप मणिपूर’ सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून उद्योजक होण्याचा पर्याय देऊन त्यांनी युवकांशी नाळ जोडली.
२००२ साली डेमॉक्रॅटिक रिव्हॉल्युशनरी पार्टीच्या तिकिटावर हेनगांग मतदारसंघातून निवडून येऊन सिंह यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरू केला. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इबोबी सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ साली ते चौथ्यांदा भाजपतर्फे हेनगांगमधून निवडून आले.
माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह विजयी
’मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते ओक्राम इबोबी सिंह यांनी थुबाल मतदारसंघात त्यांचे भाजपचे प्रतिस्पर्धी बसंत सिंह यांचा २५४३ मतांनी पराभव केला.
’२०१२ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री राहिलेल्या इबोबी यांना १५०८५ मते, तर भाजप उमेदवाराला १२५४२ मते मिळाली.
’शिवसेनेचे कोनसाम मायकेल सिंह हे १६२२ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर हाहिले. काँग्रेसच्या उमेदवाराला ५१ टक्के, तर भाजप उमेदवाराला ४२ टक्के मते मिळाली.