आंतरराष्ट्रीय आकर्षण ठरलेले ‘कोची बिएनाले’ हे द्वैवार्षिक महाप्रदर्शन यंदा ३१ देशांतील ९७ कलावंतांच्या सहभागानिशी सोमवारपासून येथे सुरू झाले. चित्रकारांखेरीज कवी, शास्त्रीय गायक, कादंबरीकार, वास्तुरचनाकार यांचाही समावेश मुख्य प्रदर्शनात असून ६० कलामहाविद्यालयांतील ६०० विद्यार्थी; २० अन्य प्रदर्शनांतून आणखी सुमारे १५० कलावंत, असा या द्वैवार्षिकीचा पसारा आहे.

जगभरच्या २००हून अधिक शहरांतील बिएनाले जरी दृश्यकलेवरच भर देणाऱ्या असल्या, तरी ‘वैविध्याची जपणूक हे कलेचे वैशिष्टय़च नव्हे तर कार्यही आहे. या विचाराने यंदा दृश्यकलेच्या बाहेरही पाहून, वैविध्याचे मूल्य आम्ही शाबूत ठेवतो आहोत’ – अशा शब्दांत, कोणतेही राजकीय विधान करणे टाळून, यंदाच्या खेपेचे नियोजक (क्युरेटर) व शिल्पकार सुदर्शन शेट्टी यांनी या उपक्रमामागील विचारसूत्र सांगितले.

दर दोन वर्षांनी फोर्ट कोची बेटावरच विविध ठिकाणी भरणाऱ्या या प्रदर्शनाला केरळ सरकारने २०१२च्या पहिल्या खेपेपासून मोठा पाठिंबा दिला असून दर खेपेला केरळचे मुख्यमंत्री या ‘बिएनाले’चे औपचारिक उद्घाटन करतात.

तो प्रघात यंदाही पाळला गेला. येत्या २९ मार्चपर्यंत चालणाऱ्या या द्वैवार्षिकीला यंदाही चार लाख ते साडेचार लाख कलारसिक, तिकीट काढून भेट देतील असा अंदाज आहे.