सौदी अरेबियातील नव्या कामगार कायद्यामुळे लाखो भारतीय कामगारांवर गदा कोसळली असून, आतापर्यंत एक लाख ३४ हजार कामगार मायदेशी परतले आहेत. सौदी अरेबियातील परिस्थितीवर भारत सरकारचे लक्ष असून, लवकरच या प्रश्नी तोडगा काढला जाईल, असे अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री वायलर रवी यांनी म्हटले आहे. सौदी अरेबियाने त्यांच्या कामगार धोरणांमध्ये बदल केला असून, ‘निताकत’ हे जाचक अटी असलेले नवे धोरण आणले आहे. या कायद्यानुसार परदेशी नागरिकांना कामगारांचा दर्जा नसेल आणि तिथे राहणाऱ्यांसाठी अनेक जाचक नियम असतील, असे धोरण ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या आखाती देशातील लाखो परदेशी कामगार देश सोडून जात आहेत. मात्र आतापर्यंत कोणत्याही भारतीय नागरिकाचा तिथे छळ झालेला नाही, असे रवी यांनी स्पष्ट केले. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्या असून, तिथे भारतीय कामगारांच्या मदतीची सोय करण्यात आली आहे.

Story img Loader