‘दिल्ली ट्रान्स्पोर्ट कंपनी’च्या बसचालकाने अतिवेगात बस चालवून त्यामुळे बसखाली ठार झालेल्या युवकाच्या कुटुंबियांना १.१९ कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात दावे लवादाने युनायटेड इन्शुरन्स लिमिटेड या कंपनीला दिला आहे.
भगवान सिंग असे या २७ वर्षीय युवकाचे नाव असून त्याची पत्नी आणि आईवडिलांना एक कोटी, १९ लाख १३ हजार ६०० रुपये भरपाईपोटी देण्यात यावेत, असे आदेशान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.
बदरपूर मेहरोली येथे जाणाऱ्या एमबी रोडवर गेल्या वर्षी ३१ मे रोजी हा अपघात झाला होता. भगवान सिंग हा आपल्या मोटारसायकलवरून तेथून जात असताना रायसिंग या बसचालकाने एका वळणावर अत्यंत बेजबाबदारपणे तसेच वेगात बस चालवून त्याच्या मोटारसायकलला धडक दिल्यामुळे जबर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याचे साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरून सिद्ध झाले असल्याचे लवादाने नमूद केले.
त्यानंतर भगवान सिंगच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तीन कोटी रुपयांच्या भरपाईसाठी लवादाकडे धाव घेतल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन लवादाने हा निर्णय दिला.भगवान सिंग हा एका खासगी कंपनीत वरिष्ठ डिझायनर म्हणून काम करीत होता आणि त्याला दहमहा ६१ हजार २४८ रुपये वेतन मिळत असल्याकडे कुटुंबियांनी लवादाचे लक्ष वेधले.
याप्रकरणी वेगात आणि बेजबाबदारपणे बस चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा मुद्दा बसकंपनी आणि चालकाने फेटाळून लावला. भगवान सिंग याने बसच्या उजव्या बाजूकडून बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी दुभाजकास धडकल्यामुळे त्यास अपघात झाला, बसमुळे नव्हे, असाही दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, लावादाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले आणि भगवान सिंग यांच्या कुटुंबियांना उपरोक्त भरपाई देण्याचा आदेश बजावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा