पश्चिम बंगालमधील बलरामपूर येथे आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता विजेच्या खांबाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या ३२ वर्षीय तरुणाचे नाव दुलाल कुमार आहे. या आठवड्यातील भाजपच्या कार्यकर्ता अशाप्रकारे लटकलेल्या अवस्थेत आढळण्याची ही दुसरी घटना आहे. तीन दिवसांपूर्वी बलरामपूरमध्येच भाजपच्या युवा मोर्चातील एका कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे या दोन घटना संशयास्पद असून याची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
दुलाल कुमार या कार्यकर्त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालनानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा यांनी या प्रकरणी तृणमूल काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले असून या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मंगळवारी भाजपच्या त्रिलोचन माहातो हा १८ वर्षीय दलित कार्यकर्ता बलरामपूर परिसरातील सुपुर्डी गावात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. आज अशाच प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे. तृणमूल काँग्रेसचे पुरुलिया परिसरातील प्राबल्य कमी होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांनी माओवाद्यांशी हातमिळवणी केली असून ते भाजप कार्यकर्त्यांना ठार करत आहेत, असा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी सिन्हा यांनी केली आहे.