अमेरिकन तरुणांसाठी अमेरिका, भारत अथवा चीनमधील रोजगाराची निर्मिती करण्याच्या प्रश्नाला बगल देत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मानवी मेंदूचे कोडे उलगडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘ब्रेन मॅपिंग’ प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
जगातील कुठलाही शक्तिशाली संगणक ज्यासह आपण जन्म घेतो त्या मेंदूच्या जवळपासही पोहोचणारा नाही. या मेंदूच्या कार्याबाबतचे गूढ अद्यापि उलगडण्यात यश आलेले नाही.  ‘ब्रेन’ ( ब्रेन रिसर्च थ्रू अॅडव्हान्सिंग इनोव्हेटिव्ह न्युरोटेक्नॉलॉजी) प्रकल्पाच्या माध्यमातून यात बदल घडेल. शास्त्रज्ञांना मेंदूच्या संशोधनाच्या मर्यादेवर मात करून आपण विचार कसे करतो, आपला मेंदू गोष्टी कशा आकलन करून घेतो आणि आपली स्मृती कशी कार्यशील होते, याबाबतचे आजवरचे गूढ उकलले जाऊ शकेल आणि त्याचा उपयोजित संशोधनामध्ये वापर होईल, असा विश्वास ओबामा यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये व्यक्त केला.
तरतूद कशी?
आर्थिक वर्ष २०१३-१४च्या अंदाजपत्रकामध्ये १० कोटी अमेरिकी डॉलर मेंदू संशोधनासाठी खर्च करण्यात येणार आहेत. मेंदूविषयक आजारांवर संशोधन, तसेच उपचार करण्यात येतील. स्मृतिभं्रश तसेच इतर गंभीर आजारांवर या संशोधनातून उपचार शोधण्यात येतील. मेंदूच्या कार्याची तपशिलात छायाचित्रे काढण्यात येतील. मेंदूची कार्यप्रणाली, मेंदूमधील लहानात लहान घटकांची रचना यांच्या अभ्यासावर भर देण्यात येईल.
ओबामांची इच्छा?
मेंदूतील सूक्ष्मतम भागांचे परिशीलन करण्याची क्षमता मानवाच्या आवाक्यात आली आहे. मानवी मेंदूच्या विशिष्ट भागातील कार्यप्रणाली कशी होते, याचा उलगडा त्यामुळे तपशिलात कळू शकते. मानवी मेंदूमधील अब्जावधी मज्जातंतू तितक्याच संख्येने असलेल्या कार्यप्रणाल्यांसोबत एकाच वेळी संलग्न राहात असल्याने हा अभ्यास अवघड आहे. या अभ्यासामुळे मेंदू नोंदी कशा करतो, कार्य कसे होते, माहितीचे त्यात साठवण कसे होते, माहिती संकलन आणि संचलन कसे होते, मानवी मेंदूचा स्वभावावर होणारा परिणाम कसा असतो, हे कळेल, असा ओबामांना विश्वास आहे. त्यासाठी विविध उद्योग संस्था, संशोधन संस्था, मदतकर्ते यांना ओबामांनी मदतीची हाक दिली आहे.
संशोधन क्षेत्राच्या विकासामुळे कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगा, ग्रह यांची ओळख आपण करून घेऊ शकतो, अणूच्या छोटय़ातील छोटय़ा भागाचेही परीक्षण आपण करू शकतो, मात्र ही प्रगती साध्य करूनही आपल्या दोन कानांच्या मध्ये असलेल्या तीन पौंड वजनाच्या मेंदूचे रहस्य आपल्याला उलगडता आलेले नाही. बराक ओबामा, अमेरिका