देशात सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव आनंदात साजरा केला जात आहे. या उत्सवादरम्यान एक दु:खद घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत गरबा खेळताना किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये किशोरवयीन मुलांसह मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात लहान मुलगा १३ वर्षांचा असून तो बडोदा येथील रहिवासी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी अहमदाबादमधील २४ वर्षीय तरुण गरबा खेळत असताना अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. तसेच कपडवंज येथेही एका १७ वर्षीय मुलाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशाच प्रकारची अनेक प्रकरणे समोर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त, नवरात्रीच्या पहिल्या सहा दिवसांत आपत्कालीन विभागाला हृदयाशी संबंधित समस्यांसाठी ५२१ फोन कॉल आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसाठी सुमारे ६०९ फोन कॉल आले आहेत. हे कॉल्स संध्याकाळी ६ ते पहाटे २ च्या सुमारास आले आहेत. साधारणत: या कालावधीत गरबा साजरा केला जातो. या घटनांनंतर राज्य सरकार सतर्क झालं असून गरबा स्थळांजवळील सर्व सरकारी रुग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांना (CHCs) अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा- VIDEO: उपवासाचे नियम काय असतात? शारदीय नवरात्रीचे उपवास वेगळे असतात का?

तसेच गरबा आयोजकांनादेखील आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्रमस्थळी त्वरीत प्रवेश करण्यासाठी रुग्णवाहिकांसाठी कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गरबा आयोजकांनी कार्यक्रमस्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिका तैनात करून सहभागींच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशा सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या नवरात्री उत्सवापूर्वी गरब्याचा सराव करताना गुजरातमध्ये तिघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 deaths in past 24 hrs by heart attack at garba event in gujarat rmm
Show comments