एपी, लॉस एंजलिस
अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिस येथे लागलेल्या भीषण वणव्याचा फटका १० हजारांहून घरे, इमारतींना बसला आहे. वणवे अद्याप पसरतच असून, या वणव्यांमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
व्हेंचुरा काउंटी येथून जवळच एके ठिकाणी नव्याने वणवा पेटला आहे. वाऱ्यामुळे ही आग लवकरच सगळीकडे पसरेल, अशी प्रतिक्रिया लॉस एंजलिसच्या महापौर कॅरेन बास यांनी दिली. बचाव पथकांचे काम अविरत सुरू असून, वणवे विझविण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली होत आहेत.
किमान पावणेदोन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश आहेत. वणव्यांनी आतापर्यंत ११७ चौरस किलोमीटर (साधारण सॅन फ्रान्सिस्कोच्या क्षेत्रफळाइतका) इतका भाग व्यापला आहे. दरम्यान, वणव्यांच्या ठिकाणी लूटमारीच्याही घटना घडल्या असून, २० जणांना अटक करण्यात आली आहे. सँटा मोनिका येथे कायदा सुव्यवस्था नसल्याने संचारबंदी लागू केली आहे. वणव्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना अन्यत्र जावे लागले आहे.
हेही वाचा >>>राज्यातील रामसर स्थळांचे संरक्षण न्यायालयाच्या देखरेखीखाली, न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल
हॉलीवूडमधील अभिनेत्यांची घरे खाक
कॅलिफोर्नियामधील श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा कॅलाबासास आणि सँटा मोनिका या भागाकडे वणव्यांची धग पोहोचली. या ठिकाणी हॉलीवूडमधील महत्त्वाच्या व्यक्ती राहतात. मँडी मूरे, कॅरी एल्वस् आणि पॅरिस हिल्टन यांची घरे भस्मसात झाली आहेत. बिली क्रिस्टल आणि त्यांची पत्नी जेनिस यांनाही त्यांचे ४५ वर्षांपासूनचे घर गमवावे लागले. याखेरीज, ग्रंथालय, दोन किराणा दुकाने, बँका, बुटिक नष्ट झाले.
काय झाले ?
● वणव्याने जवळपास ११७ चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापले आहे. सॅन फ्रान्सिस्को या शहराएवढा वणव्याचा हा विस्तार आहे.
● वणवे जलद पसरत असल्याने बचावकार्यासाठी अत्यंत कमी वेळ
● गस्तीच्या वाहनांखाली पोलिसांचा आश्रय
● सर्व रस्त्यांवर कोंडी. अनेक नागरिक पायीच दुसरीकडे निघाले.