सुकमा : छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी सुरक्षा दलांच्या कामगिरीचे कौतुक केले असून, बस्तर भागात शांतता आणि प्रगतीचा काळ पुन्हा आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या भागात सुकमा जिल्ह्याचाही समावेश आहे. भेज्जी पोलीस स्थानकाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलवादविरोधी मोहिमेत सहभागी झाले. पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी ही माहिती दिली. माओवाद्यांच्या कोंता आणि किस्ताराम क्षेत्र समितीचे सदस्य जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
बस्तरमध्ये विकास, शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. या ठिकाणी विकास, शांतता आणि प्रगतीचे वातावरण पुन्हा आले आहे.– विष्णू देव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड