सियाचिन ग्लेशियरमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या हिमस्खलनामुळे लष्कराचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून संयुक्तपणे शोधमोहीम सुरू करण्यात आली असल्याचे लष्कराचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी सांगितले.
सियाचिन ग्लेशियरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेनजीक गस्त घालण्यासाठी असलेल्या चौकीजवळ हिमस्खलन झाल्यामुळे दहा जवान त्यामध्ये सापडल्याची भीती आहे. ढिगारा बाजूला काढत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. याकामासाठी हवाई दलाचीही मदत घेण्यात येते आहे. या भागामध्ये हिमस्खलनाच्या घटना सातत्याने घडत असतात. गेल्याच महिन्यात हिमस्खलन झाल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता.
समुद्रसपाटीपासून १९००० फूट उंचीवर सियाचिन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम लष्कराच्या जवानांकडून करण्यात येते. अत्यंत विषम नैसर्गिक परिस्थितीत जवान या ठिकाणी कार्यरत असतात. हिवाळ्यामध्ये येथील किमान तापमान उणे ६० अंश सेल्सियसपर्यंत खाली येते.

Story img Loader