वाढदिवसाचा केक खाल्ल्याने एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हा केक ऑनलाईन मागवण्यात आला होता. केक खाल्ल्यानंतर घरातल्या लोकांना त्रास होऊ लागला. उलट्या, मळमळ अशा तक्रारी होऊ लागल्या. अशातच ज्या मुलीचा वाढदिवस होता त्या दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या मुलीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केक खाण्याआधी ही मुलगी अगदी व्यवस्थित आहे. छान धमाल मस्ती करताना दिसते आहे. केक खाल्ल्यानंतर या मुलीची प्रकृती बिघडली. काही तासांनी तिचं शरीर थंड पडलं. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचारही केले मात्र काही वेळाने तिला मृत घोषित केलं.
पंजाबमधल्या पटियाला या ठिकाणी ही घटना घडली आहे. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या मुलीचं नाव मानवी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच केक कुठून आणला गेला होता त्याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
मुलीच्या आजोबांनी काय सांगितलं आहे?
“आम्ही ऑनलाईन केक संध्याकाळी ६ वाजता मागवला होता. तो संध्याकाळी ६.१५ वाजता आला. ७ वाजता केक कापला. हा केक खाल्ल्यानंतर सगळ्यांचीच तब्बेत बिघडली. कुणाला गरगरु लागलं, कुणाला उलट्या झाल्या. मानवीचा वाढदिवस होता. तिने आणि तिच्या आठ वर्षांच्या बहिणीने केक खाल्ला. मानवी आणि तिच्या लहान बहिणीला उलट्या झाल्या. लहान बहिणीला मानवीपेक्षा जास्त उलट्या झाल्या. मानवीच्या तोंडातून फेस बाहेर आला. आम्हाला वाटलं उलटीमुळे झालं असेल, थोड्या वेळात बरं वाटेल. कारण उलट्या झाल्यानंतर मानवी झोपायला गेली. काही वेळाने ती आली आणि पाणीही मागितलं. पहाटे चारच्या सुमारास आम्ही पाहिलं तेव्हा तिचं शरीर थंड पडलं होतं. तातडीने तिला रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी तिला ऑक्सिजन लावला, ईसीजी काढला. त्यानंतर सांगितलं की तिचा मृत्यू झाला. ” अशी माहिती मानवीच्या आजोबांनी दिली आहे.
मुलीच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणी कारवाई केली पाहिजे असं या मुलीच्या आजोबांनी म्हटलं आहे. तसंच या प्रकरणानंतर ऑनलाईन जेवण, खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सनी जेवण व्यवस्थित आहे ना? हे तपासून मग ते ग्राहकाला दिलं पाहिजे.