मध्य प्रदेशातील कटनी जिल्हय़ात एका दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला व नंतर तिचे प्रेत बायोगॅस टाकीत टाकण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप मिश्रा यांनी सांगितले, की बाऱ्ही भागात ही घटना झाली असून, त्यात टाकीतून वास येऊ लागल्याने एका शेतकऱ्याने डोकावून पाहिले असता त्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले असून, बलात्कारानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला व नंतर प्रेत बायोगॅस टाकीत टाकण्यात आले. बुधवारी ही मुलगी काकाबरोबर बाहेर गेली होती. पण नंतर घरी परत आली नाही. ती घरी परत आली असावी असे वाटल्याचे काकाने तिच्या आईवडिलांना सांगितले. नंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, पण ती कुठेच  सापडली नाही. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सर्व प्रकारे चौकशी सुरू आहे. सध्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader