काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या. चार दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी बेहिशोबी रोख रकमेची मोजणी सुरू आहे. ही रक्कम ३०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. बुधवारपासून (६ डिसेंबर) प्राप्तीकर विभागाने कारवाई सुरू केली होती. एकाच धाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. ओडिशामधील बोध डिस्टलरी प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयात सर्वाधिक रोकड आढळली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्तीकर विभागाने जप्त केलेल्या रोख रकमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि. १० डिसेंबर) मोजणी पूर्ण होऊन या कारवाईत जप्त केलेल्या एकूण रोख रकमेचा तपशील दिला जाईल. ओडिशा जिल्ह्यातील बोध डिस्टलरी प्रा. लि. या कंपनीच्या झारखंड आणि पश्चिम बंगाल येथे असलेल्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले होते. ही कंपनी काँग्रेस खासदार धीरज साहू यांची असून त्यांचे सुपुत्र रितेश साहू हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. धीरज साहू यांचे मोठे बंधू उदयशंकर प्रसाद हे कंपनीचे अध्यक्ष आहेत. शनिवारी धीरज साहू यांचे निकटवर्तीय असलेल्या राज किशोर जैस्वाल यांच्या निवासस्थानीही धाड टाकण्यात आली.

हे वाचा >> धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

अधिकृत नोंदीच्या व्यतिरिक्त अवैध मद्य विक्री, मद्य वितरक, विक्रेते आणि व्यावसायिक गटांकडून पैसे गोळा करणे इत्यादी शिक्षेस पात्र असलेल्या कारवाया केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतरच प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली, असे यापूर्वीच विभागाने जाहीर केले आहे. शुक्रवारी बोलंगीर जिल्ह्यातील रितेश साहू यांचे सहकारी आणि मद्य विक्रेते बंटी साहू यांच्या घरावर धाड टाकून पैशांनी भरलेल्या २० बॅग जप्त करण्यात आल्या. नाव न उघड करण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप या पैशांची मोजणी होणे बाकी आहे.

नोटा मोजण्यासाठी ४० मोठ्या मशीन तैनात

“नोटा मोजण्यासाठी आम्ही ४० मोठ्या आणि काही छोट्या मशीन तैनात केल्या आहेत. जेणेकरून ही कारवाई लवकर पूर्ण केली जाईल. आम्ही बोलंगीर आणि संबलपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला विनंती केली आहे की, त्यांनी बँकेतील कर्मचारी नोटांजी मोजणी करण्याच्या कामासाठी द्यावेत”, अशीही माहिती प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

काँग्रेसने हात झटकले

दरम्यान काँग्रेसने खासदार धीरज साहू यांच्या कारवाईनंतर हात झटकले आहेत. काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत साहू यांनीच सर्व काही स्पष्ट केलं पाहिजे.

कोण आहेत खासदार धीरज साहू?

राज्यसभेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार धीरज प्रसाद साहू यांचा जन्म रांची येथे २३ नोव्हेंबर १९५५ रोजी झाला. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा राज्यसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. २००९ साली ते पहिल्यांदा खासदार झाले. तर २०१८ साली तिसऱ्यांदा त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. साहू यांचे वडील साहेब बलदेव साहू हे बिहार राज्यातील छोटा नागपूर जिल्ह्यात राहणारे होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून साहू यांचे कुटुंब काँग्रेसशी जोडलेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 officers at congress mp dheeraj sahu premises raid recovery to touch rs 300 crore kvg