शिसवाचं लाकूड हे अनेक गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त असून त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे त्यापासून बनवलेल्या फर्निचरची किंमतही जास्त असल्याचे म्हटले जाते. हे लाकूड जितके जुने तितके चांगले असे म्हटले जाते. त्यामुळेच या लाकडाच्या जुन्या खोडाची किंमत किती असेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. केरळमध्ये अशाच एका १०० वर्षापूर्वीच्या शिसवावर सरकारी लिलाव लावण्यात आला आहे. आतापर्यंत शिसवाला मिळालेली ही किंमत सर्वाधिक किंमत आहे असे म्हटले जात आहे. ३१० मीटर लांब आणि २४६ सेंटीमीटर रुंद असलेल्या या लाकडाला १० लाख ५८ हजार रुपये इतकी किंमत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वायनाड येथील वनविभागाच्या डेपोमध्ये हा लिलाव करण्यात आला. कोची येथील जेमवूड यांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने लिलाव लावला होता. या कंपनीद्वारे विविध वाद्यं बनविण्यासाठी लाकडाची निर्यात केली जाते. सरकारी डेपो ऑफीसर असलेल्या आशालता यांनी सांगितले, हा वृक्ष १०० वर्ष जुना होता. ज्या जमिनीवर हे लाकूड होते ती जमिन सरकारने दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या सैनिकांना दिली होती. शिसवाचे हे झाड मार्च महिन्यात कापण्यात आले होते. त्यानंतर या लाकडाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या लिलावामध्ये शिसवाच्या लाकडाच्या लिलावाबरोबरच इतरही काही वृक्षांचे लिलाव करण्यात आले. यामधून सरकारी तिजोरीत १.३६ कोटींच्या रकमेची भर पडली. ज्या कंपनीला १० लाखांहून जास्त किंमतीचे शिसव विकण्यात आले त्या कंपनीने आपण हे लाकूड गिटारचे भाग बनविण्यासाठी वापरणार असल्याचे सांगितले. या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातील शिसवाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच हे लाकूड सर्वात महाग लाकडात गणले जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 year old rosewood from kerala sold at record price auction