लांच्छनास्पद कृत्याच्या कटू स्मृती सामोऱ्या येतात- डॉमनिक अ‍ॅसक्विथ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालियनवाला बाग येथे १०० वर्षांपूर्वी जे घडले त्यातून ब्रिटिशांच्या काळातील एक लांच्छनास्पद कृत्याच्या कटू स्मृती सामोऱ्या येतात. जालियनवाला बाग येथे शंभर वर्षांपूर्वी घडलेली हत्याकांडाची घटना ही खेदजनक होती यात शंका नाही, असे ब्रिटनचे उच्चायुक्त डॉमनिक अ‍ॅसक्विथ यांनी येथील स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले. शनिवारी सकाळी त्यांनी १३ एप्रिल १९१९ रोजी हत्याकांड झाले त्या ठिकाणी जाऊन स्मृतिस्थळावर पुष्पचक्र वाहिले.

त्यांनी अभ्यागत पुस्तिकेत लिहिले आहे की, जालियनवाला बाग येथे १०० वर्षांपूर्वी जे घडले त्यातून ब्रिटिशांच्या काळातील एक लांच्छनास्पद कृत्याच्या कटू स्मृती सामोऱ्या येतात. त्या वेळी जे घडले व लोकांना ज्या यातना झाल्या असतील त्याबाबत आपण खेद व्यक्त करतो. भारत व ब्रिटन हे दोन्ही देश २१व्या शतकातील भागीदारीसाठी वचनबद्ध आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारीच ते हत्याकांड म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातील लांच्छनास्पद डाग आहे असे त्यांनी म्हटले होते. मे यांनी त्या वेळी औपचारिक माफी मागण्याचे टाळले होते.

माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी भारत भेटीत जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत, तो लांच्छनास्पद डाग असल्याचेच म्हटले होते, याची आठवण अ‍ॅसक्विथ यांनी करून दिली. ब्रिटिश राजवटीमधील एक वेदनादायी उदाहरण असेच या हत्याकांडाचे वर्णन राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केले आहे, असे सांगून अ‍ॅशक्विथ म्हणाले, आपले पणजोबा एच. एच. अ‍ॅशक्विथ हे १९०८ ते १९१६ या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांनीही ही सर्वात भयानक घटना असल्याचे म्हटले होते.

माफी का मागत नाही?

जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत ब्रिटिश सरकार माफी का मागत नाही, असे वार्ताहरांनी ब्रिटनचे उच्चायुक्त डॉमनिक अ‍ॅसक्विथ  यांना विचारले असता ते म्हणाले की, हा महत्त्वाचा प्रश्न आहे हे मलाही माहिती आहे, पण मी येथे कशासाठी आलो आहे यावरून तरी तुम्हाला योग्य तो संदेश मिळाला असेल. शंभर वर्षांपूर्वीच्या जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी येथे आलो आहे.