२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याबाबत संपूर्ण देशात उत्सुकता आहे. अयोध्येतही यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. राममंदिर हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना यात आपणही योगदान द्यावं, असं वाटतं. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खास अगरबत्ती बनवली जात आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे ही अगरबत्ती बनवली जात असून याची लांबी १०८ फूट इतकी आहे. ही अगरबत्ती पूर्णपणे तयार झाल्यानंतर अयोध्येला पाठवली जाणार आहे. वडोदरा येथील एका शेतात १० हून अधिक लोखंडी ट्रायपॉड स्टँड लावून ही अगरबत्ती बनवण्याचं काम सुरू आहे. याबाबतचे काही फोटो समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. निमंत्रितांमध्ये चार हजार संतांचाही समावेश आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र यांनी ‘एक्स’ वर याबाबतची माहिती दिली आहे. तसेच देशभरातील सुमारे १५० डॉक्टरही यादिवशी सेवा देणार आहेत. अयोध्येच्या कानाकोपऱ्यात लंगर, भोजनालय आणि भंडाराचं (मोफत जेवण) आयोजन करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.