10th Board Exam class 10 student shot dead Crime News : दहावीची बोर्डाची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात. मात्र बिहारमधील रोहतक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून एकाने वर्गातील मित्रांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
दहावीचा सामाजिक शास्त्राचा पेपर देऊन विद्यार्थी घरी परतत असताना गुरूवारी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी संस्कृत भाषेच्या परीक्षेवेळी आरोपीने त्याच्या दोन वर्गमित्रांना त्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्यास सांगितले होते, पण त्या दोघांनी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने दोघांना परीक्षा केंद्राच्या बाहेर धमकी दिली आणि त्यानंतर त्यांच्यात त्यांच्यात हाणमारी देखील झाली. यावेळी इतर विद्यार्थ्यांनी मध्ये पडत त्यांना शांत केले.
नेमकं काय झालं?
दुसऱ्या दिवशी हे दोन विद्यार्थी जेव्हा इतराबरोबर ऑटोमधून घरी जात होते, तर दुसरा मुलगा त्याच्या मित्रांबरोबर त्यांचा पाठलाग करत होता. त्याने ऑटो थांबवण्यास भाग पाडले आणि मृत विद्यार्थ्याबरोबर वाद घालू लागला असे पोलिसांनी सांगितले. वाद सुरू असताना त्याने देशी बनावटीच्या बंदुकीतून गोळीबार केल्याचा आरोप आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांपैकी एक विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी बचावला. रोहतासचे एसपी रौशन कुमार यांनी सांगितले की, ही घटना संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कव नदीवरील पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग २ येथे घडली.
सासाराम उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने संशयिताला त्याच्या मामाच्या घरातून ताब्यात घेतले. पथकाने गोळीबारात वापरलेले पिस्तूल आणि त्याच्या मामाच्या घरामागे लपवलेले मोबाईल फोन देखील जप्त केले, असेही पोलिसांनी सांगितले.
“या घटनेत इतर कोणी सहभागी होते का याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हालचालींची माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे,” असे एसपी म्हणाले. दरम्यान शुक्रवारी पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी महामार्गावर निदर्शने केली.