10th Board Exam Topper Dies: काही दिवसांपूर्वीच गुजरात बोर्डाच्या दहावी इयत्तेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये गुजरातमधील मोरबी येथील हीर घेटिया हिने तब्बल ९९.७० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले होते. पण याच हीरच्या बाबत एक धक्कादायक वृत्त सध्या समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या डोंगराएवढ्या मोठ्या यशाच्या कौतुक करणाऱ्या पोस्ट्सना आता दुःखाची काठ जोडली गेली आहे. प्राप्त माहितीनुसार १६ वर्षीय हीरने निकालाच्या नंतर चार दिवसांनी आपले प्राण गमावले आहेत. नेमकं तिला काय झालं होतं, जाणून घेऊया..
हीर घेटियाचं निधन कशामुळे?
१६ वर्षीय हीर ही गुजरात बोर्डातून पहिली आली होती. बुधवारी ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाला असे समजतेय. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (GSEB) निकाल 11 मे रोजी जाहीर झाला. हीर घेटियाने १० वीच्या परीक्षेत ९९.७० टक्के गुण मिळवले होते.
प्राप्त माहितीनुसार, हीरला ब्रेन हॅमरेज झाला होता. निकालाच्या महिनाभरापूर्वी राजकोटमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. शस्त्रक्रिया तेव्हा यशस्वी झाली आणि तिला डिस्चार्ज देण्यात आला. ऑपरेशननंतर ती घरी गेली पण एक आठवड्यापूर्वी तिला पुन्हा श्वास घेण्यात त्रास होऊ लागला तसेच हृदयातही वेदना जाणवू लागल्या.
यानंतर तिला हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी हीरच्या मेंदूचा एमआरआय काढला असता त्यांना अहवालात असे दिसून आले की तिच्या मेंदूच्या सुमारे ८० ते ९० टक्के भागाने काम करणे थांबवले आहे. बुधवारी तिच्या हृदयाची धडधड सुद्धा थांबली आणि हीरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा<< सद्गुरुंच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव; कशामुळे उद्भवते ही स्थिती? धोका कसा ओळखावा, शरीर देत असते हे संकेत
हीर डॉक्टर न होता सुद्धा इतरांचे जीव वाचवू शकेल!
दरम्यान, आपल्या पोटच्या लेकीला गमावल्यावर तिच्या पालकांनी घेतलेला एक निर्णय मात्र कौतुकास पात्र ठरत आहे. हीरच्या वडिलांनी सांगितले की, हीरला डॉक्टर व्हायचे होते. तिचे हे स्वप्न आम्ही तिचे शरीरदान करून पूर्ण करणार आहोत. ती डॉक्टर न होता सुद्धा इतरांचे जीव वाचवू शकेल. तिचे डोळे आणि तिचे शरीर आम्ही गरजूंना दान केले आहे.”