मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी करत बंगळुरूतील एका ४२ वर्षीय महिला अकाउंटंटला सुमारे ११ लाखांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. बंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे अनेक गुन्हे दाखल झाले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – मासिक पाळीच्या त्रासावेळी सुट्टीची मागणी; याचिका दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्व बंगळुरूतील कग्गदासपुरा येथे राहणाऱ्या विनूथा नावाच्या एका महिलेला १४ फेब्रुवारी रोजी एका अज्ञान नंबरवरून कॉल आला होता. यावेळी समोरील व्यक्तीने मुंबईतील कुरिअर फर्ममधून बोलत असल्याचे महिलेला सांगितलं. तसेच तिचे एक पार्सल मुंबईमध्ये अडकले असून आधार कार्डची मागणी केली. त्यानंतर महिलेने त्याला आधार नंबर दिला.
हेही वाचा – Hindenburg on Adani: सर्वोच्च न्यायालयाचा अदाणींना झटका, माध्यमांना निर्देश देण्यास नकार!
काही वेळाने महिलेला आणखी एका अज्ञान नंबरवरून कॉल आला. यावेळी त्या व्यक्तीने तिला मुंबई गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच आधार कार्डचा वापर करून तिच्या नावाने खोटे बॅंक खाते उघडले जात असल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी महिलेने यासंदर्भात मला कोणताही मेजेस आला नसल्याचे सांगितलं. मात्र, त्यांनी तिला धमकावून बॅंक खात्यांची माहिती मागितली. त्यानंतर महिलेने घाबरून ही माहिती त्यांना दिली. मात्र, काही वेळातच तिच्या खात्यातून ११ लाख रुपये काढल्याचे तिला समजले.
दरम्यान, महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी महिन्यात अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल झाल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आहे.