कपोलकल्पित नावांनी वास्तव बदलणार नाही, भारताची संतप्त प्रतिक्रिया
पीटीआय, नवी दिल्ली
चीनने अरुणाचल प्रदेशमधील आणखी काही ठिकाणांना चिनी नावे दिल्याची बाब समोर आल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. चीनने दिलेली ही नावे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असून कपोकल्पित नावांमुळे वास्तव बदलू शकत नसल्याचे मंत्रालयाचे प्रवक्ता अिरदम बागची यांनी स्पष्ट केले.
अरुणाचल प्रदेशातील आणखी ११ ठिकाणी ‘दक्षिण तिबेट’चा भाग असल्याचा दावा करत चीन सरकारने त्यांना नवी चिनी नावे दिल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. याला प्रत्युत्तर देताना बागची म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांचे नाव बदलण्याचे चीनचे कृत्य आम्ही स्पष्ट शब्दांत धुडकावले आहे. चीनने या आधीही असे प्रयत्न केले होते. त्या त्या वेळी आम्ही ते ठामपणे नाकारले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.. कोणतीही काल्पनिक नावे दिल्यामुळे हे वास्तव कधीही बदलणार नाही.
गेल्या महिन्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पूर्व लडाखमधील भारत-चीनदरम्यान प्रत्यक्ष ताबारेषेवरील परिस्थिती ‘अत्यंत नाजूक’ असल्याचे सांगितले होते. लष्करी मूल्यांकनानुसार येथील स्थिती ‘अत्यंत धोकादायक’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. काही ठिकाणी दोन्ही देशांच्या लष्कराने माघार घेतली असली तरी काही ठिकाणी दोन्ही बाजूंचे सैन्य अत्यंत जवळ तैनात आहे. गेल्या तीन वर्षांपासून चीन व भारतात या भागातील काही टापूंवरून लष्करी तणाव आहे.
अरुणाचल प्रदेशच्या चीनने प्रमाणित केलेल्या भौगोलिक नावांची यादी जाहीर करण्याची ही तिसरी वेळ आहे. अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांच्या चीनने प्रमाणित केलेल्या नावांची पहिली यादी २०१७ मध्ये प्रसिद्ध झाली, तर १५ ठिकाणांची दुसरी यादी २०२१ मध्ये प्रसृत करण्यात आली होती.
नद्यांनाही चिनी नावे चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीमध्ये दोन भूभागांसह दोन रहिवासी क्षेत्रे, पाच पर्वतशिखरे आणि दोन नद्यांना चिनी नावे देण्यात आली आहेत. तसेच ही ठिकाणे प्रशासकीयदृष्टय़ा समावेश असलेल्या चिनी जिल्ह्यांची नावेही सूचिबद्ध करण्यात आली आहेत. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने सोमवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.