रांची : गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाने हत्या केल्याप्रकरणी रामगढच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बहुचर्चित अलीमुद्दीन अन्सारी हत्याकांड प्रकरणी कोर्टाने आज हा निर्णय दिला. निकालानंतर दोषींना कोर्टाबाहेर आणताना जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्याचंही वृत्त आहे. या निर्णयाविरोधात झारखंड उच्च न्यायालयात जाणार असल्याचं दोषींच्या वकिलांनी सांगितलं.
16 मार्च रोजी या प्रकरणी न्यायालयाने 11 आरोपींना दोषी ठरवलं होतं. न्यायालयाने या प्रकरणी 12 पैकी 11 जणांना 302 कलमांतर्गत दोषी धरलं , तर एकाला ज्युवेनाइल ठरवलं होतं. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. सुनावणी दरम्यान, न्यायालयाबाहेर अनेक राजकिय पक्षाच्या व्यक्तींनी गर्दी केली होती.
काय होती घटना –
गेल्या वर्षी 29 जून रोजी रामगड येथे जमावाने गोमांस तस्कर असल्याच्या संशयावरून अलीमुद्दीन याला जबर मारहाण केली होती. त्याच्या मारूती व्हॅन गाडीलाही आग लावण्यात आली होती. उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अलीमुद्दीनचा मृत्यू झाला होता.
अखेर आज न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.