Minor Killed Friend in Meerut: वाढत्या गुन्हेगारी घटना, हत्या, मारहाण असे प्रकार वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कशा प्रकारे पावलं उचलावीत, याबाबत पोलीस दल सातत्याने प्रयत्न करत असताना हे गुन्ह्यांचं लोण आता अल्पवयीन मुलांपर्यंतदेखील पोहोचल्याचं मीरतमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेतून अधोरेखित झालं आहे. उत्तर प्रदेशच्या मीरतमध्ये एका १२ वीत शिकणाऱ्या मुलानं ११वीत शिकणाऱ्या आपल्या १६ वर्षांच्या मित्राची डोक्यात हातोड्याचे वार करून निर्घृण हत्या केल्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास करून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं घडलं काय?
एका अल्पवयीन मुलानं आपल्या एका अल्पवयीन मित्राची हत्या केल्याच्या या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. धक्कादायक बाब म्हणजे या हत्येसाठी कारण ठरलं ते म्हणजे आरोपी अल्पवयीन मुलाचे त्याच्या मैत्रिणीसोबतचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ मृत मित्राने त्याला न विचारता त्याच्या मोबाईलमधून आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केले! इंडिया टुडेनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार उघड झाला. मृत मुलगा शनिवारी संध्याकाळी उशीरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. त्याच्या कोचिंग सेंटरमध्येही काही तपास न लागल्यामुळे त्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. तपासात सदर मुलगा त्याच्या अल्पवयीन मित्रासोबत शेवटचा दिसला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी मुलाची आधी टाळाटाळ, नंतर केला गुन्हा कबूल
पोलिसांनी या माहितीच्या आधारे आरोपी मुलाची चौकशी सुरू केली. सुरुवातीला या मुलानं पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. पण नंतर त्यानं आपला गुन्हा कबूल केला. या अल्पवयीन मुलानं पोलिसांना जवळच्याच भवनपूर परिसरात एका ठिकाणी नेलं. तिथे एका नदीच्या बाजूला मोठ्या खड्ड्यात पोलिसांना मृत मुलाचा मृतदेह आढळून आला.
तपासा समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलानं आपल्या मित्राला एका निर्जन स्थळी बोलवलं. आपला मोबाईल आपल्याला ८ हजार रुपयांना विकायचा आहे, असं सांगून त्यानं मित्राला यायला भाग पाडलं. आधी दोघांनी सोबत आणलेले पदार्थ खाल्ले. त्यानंतर संधी मिळताच सदर अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राच्या डोक्यात हातोड्यानं वार केले. त्याचा जागीच मृ्त्यू झाला.
मैत्रिणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ
आरोपी अल्पवयीन मुलाच्या मोबाईलमध्ये त्याचे मैत्रिणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ होते. ते त्याच्या मित्राने त्याच्या परवानगीशिवाय आपल्या मोबाईलमध्ये घेतले. हे जेव्हा आरोपीला समजलं, तेव्हा रागाच्या भरात त्यानं मित्राच्या हत्येचा कट रचला. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे की नाही? याचा पोलीस तपास करत आहेत.
मृत मुलगा ११वीत शिकत होता. आयआयटीची तयारीही करत होता. आपल्या पालकांचा तो एकुलता एक मुलगा होता.