पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातो आहे. इतकंच नाही तर जे जवान शहीद झाले त्यांच्याबद्दल हळहळही व्यक्त होते आहे. अशात एका अकरा वर्षाच्या मुलीने केलेली गोष्ट निश्चितच अभिमान वाटेल अशी आहे. या मुलीने तिच्या वाढदिवसासाठी जमवलेले पैसे CRPF ला दान केले आहेत. मुस्कान अहिरवर असे मुलीचे नाव आहे. ती भोपाळमध्ये रहाते. तिने तिच्या वाढदिवसासाठी पिगी बँकमध्ये पैसे साठवले होते. मात्र त्या पैशांची कोणतीही वस्तू न घेता तिने हे पैसे CRPF च्या सैनिक कल्याण फंडला दान केले आहेत.

भोपाळमध्ये रहाणाऱ्या मुस्कानचा वाढदिवस 15 फेब्रुवारीला असतो. 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये हल्ला झाला ज्यामुळे अख्खा देश हादरला. ज्यानंतर मुस्कानलाही तिचा वाढदिवस साजरा करू नये असे वाटले. मग तिने वाढदिवसासाठी पिगी बँकमध्ये जमवलेले 680 रुपये आणि मित्र मैत्रिणींकडून जमा केलेले 1100 रुपये हे सगळे पैसे सैनिक कल्याण फंडाला दिले. सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुखांकडे तिने हे पैसे जमा केले. सीमेवर जवान शहीद झाले असताना मी माझा वाढदिवस कसा साजरा करू? असा प्रश्न मला पडला त्यामुळे मी वाढदिवसासाठी जमवलेले पैसे सैन्याला देण्याचा निर्णय घेतला असे मुस्कानने म्हटले आहे. मुस्कान ही झोपडपट्टीतल्या मुलांसाठी बाल पुस्तकालय नावाचे छोटे ग्रंथालयही चालवते. सध्या ती सहावीत शिकते आहे.

Story img Loader