ऐन दसऱ्याच्या दिवशी येथील रतनगडच्या दुर्गा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांची संख्या ११५ झाली आहे. ही दुर्घटना मानवनिर्मित होती त्यामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
देवीच्या मंदिराकडे जाणारा नदीवरील पूल कोसळण्याच्या बेतात असल्याची अफवा पसरवण्यात आल्याने घडलेल्या चेंगराचेंगरीत १०० जण जखमी झाले आहेत. रतनगडचे पोलिस उपमहानिरीक्षक डी.के.आर्य यांनी सांगितले की, आमच्या माहितीनुसार ११५ जण मृत्युमुखी पडले आहेत. ते म्हणाले की, अनेक लोकांनी त्यांच्या आप्तजनांचे मृतदेह शवतपासणीनंतर नेले आहेत. या प्रकरणी एक चौकशी आयोग नेमण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तातिया येथे जखमींची भेट घेतल्यानंतर सांगितले. राज्य सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
   २००६ मध्ये याच ठिकाणी सिंध नदीत वरून पाणी सोडल्याने ५६ भाविक वाहून गेले होते, त्यानंतर सरकारने या नदीवर पूल बांधला. परंतु गर्दीच्या व्यवस्थापनात कमतरता आल्याने आताची दुर्घटना घडली. कारण उत्तर प्रदेश व आसपासच्या जिल्ह्य़ातून भाविक आले होते. राज्य सरकारच्या ढिसाळ प्रशासनामुळे चेंगराचेंगरी झाली, असा आरोप काँग्रेसने केला असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्ली येथे पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी सांगितले की, ही दुर्घटना मानवनिर्मित होती ती टाळता आली असती. पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन अनेक लोक जखमी झाले होते. त्यातून मध्य प्रदेश सरकारने काहीच धडा घेतला नाही असा याचा अर्थ होतो. तेथे प्रशासन योग्य नाही, भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. दांतियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आर.एस.गुप्ता यांनी सांगितले की, ११० मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी मृतांचा आकडा ८९ दिला असून त्यात ३१ स्त्रिया व १७ मुले असल्याचे म्हटले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक आर्य यांच्या मते मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून १०० लोक जखमी आहेत.
   उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश यांच्या सीमेवरील रतनगड येथे ऐन नवरात्रीत शोककळा पसरली असून हे ठिकाण भोपाळपासून ३२० कि.मी. अंतरावर आहे. काही बातम्यांनुसार लोकांनी रांग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या परवानगीने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दीड लाख रूपये मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना ५० हजार, तर साधारण जखमींना २५ हजार मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले की, चौकशी अहवाल दोन महिन्यात येईल व त्यावर १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल. चेंगराचेंगरीला कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर निवडणूक आयोगाच्या परवानगीने कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री चौहान यांना निवडणूक आयोगाकडून घटनास्थळी भेट देण्याची परवानगी मिळाली नाही त्यामुळे ते जाऊ शकले नाहीत.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, राज्यात अधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना भ्रष्टाचार होतो, त्यामुळे अशा घटना होतात. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या नेमणुका पैसे घेऊन भाजप सरकार करते. भाजपच्या राजवटीत ती पद्धतच पडली आहे. जे अशा प्रकारे पैसे देऊन आलेले आहेत त्यांना अशा घटनांमध्ये काहीच वाटत नाही असे ते म्हणाले.
अफवा कोणी पसरवली?
पूल कोसळत असल्याची अफवा कोणी पसरवली, याचा शोध पोलीस घेत आहेत. अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलिसांनी गर्दीवर सौम्य लाठीमार केला. मात्र, त्यामुळे संतप्त झालेल्या भाविकांनीच पोलिसांवर दगडफेक केली.