उत्तर प्रदेश हे राज्य नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतं. आता एका वेगळ्याच कारणामुळे उत्तर प्रदेश चर्चेत आलं आहे. उत्तर प्रदेशातील लोक दररोज तब्बल ११५ कोटी रुपयांची दारू पितात, असे उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागानं म्हटलं आहे. प्रयागराज येथील उत्तर प्रदेश उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्यालयाने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितलं की, उत्तर प्रदेशमध्ये राहणारे लोक दररोज सुमारे ११५ कोटी रुपयांची दारू पितात. अधिकृत आकडेवारीनुसार, यूपीच्या प्रत्येक जिल्ह्यात दररोज सरासरी अडीच ते तीन कोटी रुपयांची विक्री होते. दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील लोक दररोज ८५ कोटी रुपयांची दारू किंवा बीअरचं सेवन करत होते. ताज्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात दिवसाला ११५ कोटींची दारु प्यायली जाते.
याबाबत अधिक माहिती देताना उत्पादन शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “उत्तर प्रदेशात असे अनेक जिल्हे आहेत, जिथे एका दिवसात १२ ते १५ कोटी रुपयांची दारू आणि बीअरची विक्री होते. प्रयागराजमध्ये दररोज सरासरी साडेचार कोटी रुपयांची दारू आणि बीअरची विक्री होते.
‘या’ शहरांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक
उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबाद जिल्ह्यात दारू पिण्याचं सर्वाधिक प्रमाण आहे. येथे प्रतिदिन १३ ते १४ कोटी रुपयांची दारू प्यायली जाते. यानंतर आग्रा, मेरठ, लखनऊ, कानपूर आणि वाराणसी या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दारुची विक्री होते.