सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असतानाच आणि सरहद्दीवर भारताबरोबर तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानच्या बलूचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात ठिकठिकाणी गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या सहा बॉम्बहल्ल्यांत तब्बल १२२ नागरिकांनी प्राण गमावले तर २५१ जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
क्वेट्टातील आलमदार मार्ग आणि विमानतळ मार्गावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यांमध्ये ८८ जण ठार तर १४१ जखमी झाले. स्नूकर क्लबमध्ये प्रथम हा स्फोट झाला. तेथे प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी तसेच सुरक्षा सैनिकांची गर्दी झाल्यानंतर काही मिनिटांच्या अंतराने आणखी तीन बॉम्बस्फोट झाले. त्यात समा दूरचित्रवाहिनीचे कॅमेरामन इम्रान शेख आणि वार्ताहर सैफ उर रहमान मृत्युमुखी पडले. दोन पोलीस अधिकारी आणि मदत पथकातील कर्मचाऱ्यांचाही मृतांत समावेश आहे.
वाहिन्यांचे अनेक पत्रकार, कॅमेरामन आणि तंत्रज्ञ जखमीही झाले आहेत. क्वेट्टातील या स्फोटांची जबाबदारी लष्कर ए जंघवी या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे.
शुक्रवारचा पहिला बॉम्बस्फोटही क्वेट्टातच झाला. गजबजलेल्या बादशाह खान चौकात दुपारी सुरक्षा दलाच्या वाहनाखाली लावलेल्या दूरनियंत्रित बॉम्बचा स्फोट होऊन त्यात या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. २० किलोची स्फोटके या स्फोटासाठी वापरल्याचा तर्क आहे. या स्फोटात १२ जण ठार आणि ४० जखमी झाले. स्फोटाचे आवाज कित्येक किलोमीटर अंतरापर्यंतही ऐकू आले.  या हल्ल्याची जबाबदारी युनायटेड बलूच आर्मी या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे.
शुक्रवारी सायंकाळी स्वात खोऱ्यातील मिनगोरा येथे तख्तबंद मार्गावरील एका धार्मिक प्रशिक्षण केंद्राच्या तळघरात झालेल्या स्फोटात २२ जण ठार आणि ७० जखमी झाले. गॅस सििलडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना ओढवल्याचे प्रथम सांगितले गेले होते मात्र मृत व जखमींच्या शरीरात बॉम्बमध्ये वापरली जाणारी प्राणघातक सामग्री घुसल्याने हा घातपातच असल्याचे पोलिसांनी नंतर जाहीर केले. एका अल्पवयीन आत्मघातकी अतिरेक्याने हा हल्ला घडविल्याची चर्चा असून त्याला दुजोरा मात्र मिळालेला नाही. या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
या सर्व स्फोटांत अल्पसंख्यक हाजरा शिया समाजातील ५० जणांनी जीव गमावला आहे. एका दिवसात इतक्या मोठय़ा संख्येने हाजरा शियांची हत्या होण्याची ही पहिली वेळ आहे. मानवी हक्क संघटनेने या हल्ल्यांवरून सरकारवर टीका केली आहे.

Story img Loader