शहरात ३०, तर उपनगरांत ८६ उमेदवारांमध्ये लढत

मुंबई : मुंबई शहरातील दोन मतदारसंघांत ३० तर उपनगरांतील चार मतदारसंघांत ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उपनगरांतून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे आता लढती कशा असतील याचे अंतिम चित्र समोर आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील सहा मतदारसंघांत मिळून सर्वाधिक उमेदवार ईशान्य मुंबईत आहेत. या मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात आहेत.  वायव्य मुंबईत २१, उत्तर मध्य मुंबईत २०, उत्तर मुंबईत १८ असे उपनगरातील चार मतदारसंघांत मिळून ८६ उमेदवार आहेत.

उपनगरातील चारही मतदारसंघांत ९१ उमेदवारांनी अर्ज भरले होते. पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. दक्षिण मध्य मुंबईत १७ आणि दक्षिण मुंबईत १३ असे शहर विभागातील मतदारसंघांत मिळून ३० उमेदवार आहेत.

‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी, मतदानाबाबत जागृती करण्यासाठी आयोगाने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. नवमतदारांसाठी सेल्फीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ या उपक्रमामध्ये पहिल्यांदा मतदान केल्यानंतर आपला सेल्फी मतदारांनी शेअर करायचा आहे. सर्वोत्कृष्ट सेल्फीला पारितोषिक देण्यात येईल, असे मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले.

राज्यात १० हजार गुन्हे दाखल

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आणि राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानापर्यंत विविध प्रकरणांत सुमारे १० हजार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

राज्यात ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात १० हजार ४०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक अवैध दारूप्रकरणी ९७०० गुन्हे दाखल झाले आहेत. शस्त्रांचे साठे जप्त करण्यात आले, त्याबद्दल ५०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १०४ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात ३५ कोटी रुपयांची रोकड, १९ कोटी १२ लाख रुपयांची दारू, ५ कोटी ४६ लाख रुपयांचे अमली पदार्थ, ४४ कोटी ६१ लाखांचे दागदागिने  जप्त केले आहेत.

विदर्भातील अंतिम मतदान टक्केवारी

मतदारसंघ                         २०१९                   २०१४

वर्धा                                   ६१.१८                   ६४.७९

रामटेक                             ६२.१२                   ६२.६४

नागपूर                             ५४.७४                   ५७.१२

भंडारा-गोंदिया                 ६८.२७                   ७२.३१

चंद्रपूर                              ६४.६६                   ६३.२९

यवतमाळ वाशिम             ६१.०९                  ५८.८७

गडचिरोली (अंतिम टक्केवारी सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध नाही)