गेल्या वर्षीय जूनमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून १६ वर्षीय विद्यार्थिनीला चाकूने भोकसलं होतं. आरोपीनं तब्बल १४ वेळा वार करून पीडितेला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं होतं. यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांची तीन पथकं त्याच्या शोधात होते. पण त्याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर मंगळवारी रात्री मानापराई रेल्वे रुळावर आरोपी मृतावस्थेत आढळला आहे. याची माहिती पोलिसांना दिली असून पुढील तपास केला जात आहे.

संबंधित घटना तामिळनाडू राज्याच्या त्रिचीजवळील अंतिकुलम येथील आहे. मृत विद्यार्थिनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती. दरम्यान, अंतिकुलम रेल्वे पूलाजवळून जात असताना आरोपी केशवन याने तिला आडवलं आणि प्रेमाची मागणी केली. पण पीडितेनं आरोपीच्या प्रेमाला नकार दिला. यावेळी संतापलेल्या आरोपीनं पीडितेला धारदार चाकुने १४ वेळा भोकसलं आणि घटनास्थळावरून पळ काढला.

विशेष म्हणजे संबंधित मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी आरोपीवर आधीच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यानं पुन्हा पीडित मुलीचा पाठलाग सुरू केला आणि प्रेमाची मागणी केली. पण तिने नकार देताच आरोपीनं तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. पण त्याचा काही थांगपत्ता लागत नव्हता.

दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा मानापराई रेल्वे रुळाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता संबंधित मृतदेह आरोपी केशवननचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. मृताच्या वडिलांनी याबाबत पुष्टी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader