कोची : केरळ नरबळी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना स्थानिक न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. पुरावे गोळा करण्यासाठी आणि या भीषण गुन्ह्याचा तपास करण्यासाठी १२ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने बुधवारी मुख्य आरोपी शफी (५२), मसाज थेरपिस्ट भागवल सिंग (६८) आणि त्याची पत्नी लैला (५९) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गुरुवारी येथील स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कोठडीच्या अर्जात पोलिसांनी सांगितले की, नरबळी प्रकरणाची अन्य काही कारणे आहेत का याचा तपास करण्यासाठी आरोपींची अधिक चौकशी करणे आवश्यक आहे. या भीषण गुन्ह्यात आणखी बळी आहेत का, याचा तपास करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
काळय़ा जादूच्या आरोपाखाली केरळमध्ये महिलेला अटक
कोची : केरळ नरबळी प्रकरणानंतर राज्य पोलिसांनी काळी जादूविरोधात मोहीम सुरू केली असून गुरुवारी काळी जादू करत असल्याच्या संशयावरून एका ४१ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली. जादूटोणा करणे आणि संबंधित विधींमध्ये लहान मुलांना भाग घेण्यास भाग पाडल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. काळी जादू करत असल्याची या महिलेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. या चित्रफितीमध्ये काळी जादू करत असताना एक मूल बेशुद्ध पडताना दिसत आहे. ही महिला त्याच्यासमोर मंत्र म्हणत आहे आणि नृत्य करत असल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी सांगितले. या महिलेच्या ३९ वर्षीय पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या जोडप्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.