एपी, साओ पावलो
ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या पर्जन्यवनामध्ये १२० डॉल्फिन मृत्युमुखी पडल्याचे आढळले. या भागातील जलस्रोतांचे तापमान वाढल्यामुळे डॉल्फिन जिवाला मुकले असल्याचे सांगण्यात आले. ब्राझीलवर तीव्र दुष्काळाचे संकट ओढवले असून, पाण्याचे तापमान याच प्रकारे उच्च राहिल्यास मरण पावणाऱ्या डॉल्फिनची संख्या वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ब्राझीलच्या विज्ञान, तंत्रज्ञान व नवकल्पना मंत्रालयाशी संबंधित मामिरावा इन्स्टिटय़ूट या संशोधन संस्थेने यासंबंधी माहिती देताना सांगितले की, टेफे सरोवराजवळ मृत डॉल्फिन आढळले आहेत. या भागातील जलजीवांसाठी हे सरोवर महत्त्वाचे आहे.या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितींमध्ये डॉल्फिनच्या मृतदेहांवर गिधाडे बसल्याचे दिसत आहेत. या सरोवरातील हजारो मासेदेखील मृत झाले आहेत.
हेही वाचा >>>“हे तर साप अन्…”, भाजपा खासदाराची ‘इंडिया’ आघाडीवर टीका
तापमान ३९ अंश सेल्सिअसवर
गेल्या आठवडय़ात सरोवर भागातील प्रदेशाचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले होते. एरवी हे तापमान सरासरी ३२ अंश सेल्सिअस इतके असते. पाण्याचे तापमान वाढल्यामुळे मोठय़ा प्रमाणात डॉल्फिन व इतर मासे मरण पावले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >>>१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
अभ्यास पथके रवाना
चिको मेंडेस इन्स्टिटय़ूट फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झव्र्हेशन या सरकारी संस्थेकडे या सरोवराच्या संवर्धनाची जबाबदारी आहे. डॉल्फिनच्या मृत्यूंचा तपास करण्यासाठी अभ्यासकांची पथके पाठवण्यात आल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले. टेफे सरोवरात जवळपास एक हजार ४०० गोडय़ा पाण्यातील डॉल्फिन आहेत. सर्व मिळून १२० डॉल्फिन मृत्युमुखी पडल्याची माहिती संस्थेच्या अभ्यासक मिरियम मार्मोन्टेल यांनी दिली.