भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून १२५ रूपये मुल्याचे विशेष नाणे जारी केले जाणार आहे. पुढील वर्षी १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांची सव्वाशेवी जयंती साजरी केली जाणार असून त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेसने याआधीच बाबासाहेबांच्या जयंती वर्षानिमित्त वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या सर्व कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक समितीदेखील स्थापन केली होती. त्यामुळे भाजपनेही बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य स्वरूपात साजरी करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बाबासाहेबांच्या स्मरणार्थ १२५ रूपये मुल्य असणारे विशेष नाणे सरकार जारी करणार आहे. या नाण्यासंबंधीचा तपशील ठरविण्यासाठी सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वरिष्ठ पातळीवरील बैठका सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनूसार, या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असेल. याशिवाय, त्यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारकडून एका टपाल तिकिटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. तसेच यापुढे १४ एप्रिल ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा