कर्नाटकमधील भाजपच्या १३ आमदारांनी मंगळवारी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष के. जी. बोपय्या यांच्याकडे सादर केले. सदर १३ आमदार माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे कट्टर समर्थक आहेत. दरम्यान, भाजपशी संबंध तोडून येडियुरप्पा यांच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या विधान परिषदेतील पाच आमदारांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असलेली पत्रे आमदारांनी बोपय्या यांची भेट घेऊन त्यांना सादर केली. बोपय्या यांनी या आमदारांची प्रत्येक्ष भेट घेतली. हे आमदार स्वत:हून राजीनामा देत असल्याची खात्री करून घेण्यासाठी बोपय्या यांनी प्रत्येकाची स्वतंत्रपणे भेट घेतली.
या बाबत अद्यापही अनिश्चिततेचे वातावरण असले तरी विधानसभा सचिवालायातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात चल्लाकेरे (अनुसूचित जमाती) मतदारसंघातील आमदार थिप्पेस्वामी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे म्हटले आहे. अन्य १२ आमदारांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय कळू शकला नाही.
उर्वरित १२ आमदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल अपात्र ठरवावे, अशी याचिका पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. या आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांना निर्णय घ्यावयाचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा