मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्याच्या पिपोडी येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टर ट्रोली उलटल्यामुळे १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये चार लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. तर १५ लोक जखमी झाले आहेत. अपघातात बळी पडलेले प्रवाशी राजस्थानच्या मोतीपुरा गावातील असून ते एका लग्नासाठी राजगडच्या कलमपूर येथे येत असताना हा भीषण अपघात झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दिक्षित यांनी सांगितले की, १३ जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागल्यामुळे त्यांना भोपाळच्या हमिदीया रुग्णालयात दाखल केले गेले आहे. दोन जण गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधिक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. राजगड जिल्हा प्रशासकीय कार्यालयापासून ३० किमी अंतरावर अपघात घडला. राजस्थानमधून ४० ते ५० वऱ्हाडी मध्य प्रदेशमध्ये लग्नासाठी येत होते. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती पिपोडी गावानजीक उलटली.

अपघातात जखमी झालेल्या एका प्रवाशाने सांगितले की, ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाने मद्यपान केले होते. तसेच क्षमतेपेक्षा जास्त लोक ट्रॉलीमध्ये बसविले होते. ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्यानंतर अनेक लोक त्याखाली चिरडले गेले. रात्री उशीरा जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर ट्रॉली उचलल्यानंतर जखमींची सुटका झाली.

या अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत असताना जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली. एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, मध्यप्रदेशच्या राजगडमध्ये झालेल्या अपघाताची बातमी दुःखद आहे. ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले, त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करते. तसेज जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली. “राजस्थानच्या झलवर जिल्ह्यातील १३ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दुःखद आहे. या अपघाची माहिती राजस्थान पोलिसांना देण्यात आली आहे. राजस्थानचे नेते नारायण सिंह पनवर, झलवरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक हे घटनास्थळी पोहोचले आहेत. राजस्थान सरकारशी आमचा संवाद सुरू आहे. तसेच जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 dead 15 injured as tractor trolley overturns in madhya pradesh kvg