राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या बुधवारी येथे होणाऱ्या परिवर्तन रॅलीसाठी मोठय़ा संख्येने पाठीराख्यांना उपस्थित राहता यावे यासाठी १३ विशेष रेल्वे गाडय़ा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अधिकाधिक लोकांना आपल्याकडे आरक्षित करण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी  रेल्वे गाडय़ांची कल्पना वापरल्याचे बोलले जाते.
बुधवारी येथील गांधी मैदानात होणाऱ्या लालूंच्या रॅलीला बिहार तसेच झारखंडमधूनही मोठय़ा संख्येने पाठीराख्यांना उपस्थित राहता यावे यासाठी तेरा रेल्वे गाडय़ा आरक्षित करण्यात आल्याची माहिती पूर्वमध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अमिताभ प्रभाकर यांनी दिली.
या गाडय़ांच्या आरक्षणापोटी रेल्वेला १ कोटी ११ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. आम्हाला लालू प्रसाद यादव यांच्या परिवर्तन रॅलीशी संबंध नाही. रेल्वेला अधिकाधिक महसूल मिळावा यासाठीच या गाडय़ा देण्यात आल्याचे प्रभाकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २००५ नंतर प्रथमच अशा प्रकारची रॅली काढणाऱ्या राजदला गेल्या काही निवडणुकांमध्ये लोकांनी दिलेला धक्का दिला. त्यामुळे पक्षाची विशेषत: लालू प्रसाद यादव यांची लोकप्रियता कायम राखण्यासाठी ही परिवर्तन रॅली काढण्यात येणार असल्याचे बोलले जाते. ही रॅली बिहारमधील भविष्यातील राजकारणावर मोठा परिणाम करील, असा दावा राजदचे महासचिव रामकृपाल यादव यांनी केला. नितीश कुमार यांच्या सरकारविरोधात जनतेमध्ये रोष असून ते मोठय़ा रॅलीमध्ये सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.