मेघालयमधील कोळसा खाणीत 13 कामगार अडकले असून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कोळसा खाणीत पाणी भरलेलं असून सर्व कामगार त्यामध्ये अडकलेले आहेत. कामगारांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. कोळसा खाणीतील पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढलं जात असून, अडकलेल्या कामगारांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
गुरुवारी सकाळी स्थानिक प्रशासनाला यासंबंधी माहिती देण्यात आली. ‘एनडीआरएफ आणि एसडीआरएफने आपलं काम सुरु केलं आहे. कोळसा खाणीच्या मालकाविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. कोळसा खाण अत्यंत खोल आहे’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
अडकलेल्या कामगारांची नेमकी काय परिस्थिती आहे यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीत पूर्ण पाणी भरलं असल्या कारणाने कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. 2014 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने धोकादायक बेकायदेशीर कोळसा खाणींच्या उत्खननावर बंदी आणली होती. मेघालयात हा प्रकार सर्रासपणे चालतो.
नोव्हेंबर महिन्यात सामाजिक कार्यकर्ता अॅग्नेस यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतरही सुरु असलेल्या खाणींविरोधात आवाज उठवला होता. अशा खाणींची माहिती मिळवत असताना अॅग्नेस आणि त्यांची सहकारी अमित संगमा यांच्यावर हल्ला झाला होता.