डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना आनंद व्हावा असा निर्णय मेडिकल कौन्सिलने घेतला आहे. देशभरातील ३२ विविध सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण १३९० जागा वाढविण्यात येणार आहेत.
देशभरात एकूण ३६२ वैद्यकीय महाविद्यालये असून ४५,००० जागा उपलब्ध आहेत. नव्या घोषणेमुळे या जागांची संख्या ४६,५०० हजारांवर गेली आहे.
२०१३-१४ या वर्षांसाठी वैद्यकीय पदवी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची परवानगी देण्यासंबंधी अर्ज पाठविण्याबाबत अधिसूचना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियातर्फे प्रसिद्ध करण्यात आली होती. ३१ जुलै ही त्यासाठी अंतिम दिनांक होती.
त्याला अनुसरून, नवीन परवाने जाहीर करण्यात आले. वस्तुत: खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ही अधिसूचना होती, मात्र आरोग्य मंत्रालयाने केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांनाच विद्यार्थीसंख्या वाढविण्याचे परवाने दिले.
आता ५० विद्यार्थी असलेल्या महाविद्यालयांना ती संख्या १०० पर्यंत, तर १०० असलेल्या महाविद्यालयांना ती १५० पर्यंत वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Story img Loader