जम्मू – काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत जूनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीताचा १४ जणांनी अपमान केला होता. याप्रकरणी या १४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राष्ट्रगीत सुरू असताना हे १४ जण उभे राहिले नव्हते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. टेलिग्राफने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. खरे तर सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजविले जात असताना ते ५२ सेकंदापेक्षा कमी आणि ५६ सेकंदापेक्षा जास्त नसावे असा नियम आहे. राष्ट्रगीत गाताना किंवा ऐकताना सावधान स्थितीतच उभे राहून राष्ट्राला वंदन करूनच हे गीत म्हणावे असा नियम आहे. हा नियम मोडणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.
जम्मू – काश्मीरमध्ये पेडल फॉर पीस या सायकाल कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. हा कार्यक्रम जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडूनच २५ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचे लक्षात येताच याविषयी चौकशी समिती नेमण्यात आली आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
राष्ट्रगीत सुरू असताना सर्वजण उभे राहिले की नाही याची खात्री न केल्याबद्दल प्रशासनाने काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित केलं आहे. कलम १०७ आणि १५१ सीआर सीपी अंतर्गत या १४ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्वांना मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं आहे.