कायदा आणि सुव्यवस्थेचा मागमूसही नसलेल्या वायव्येकडील वजिरीस्तान प्रांतात वाहतुकीच्या रस्त्यानजीक घडवून आणलेल्या स्फोटात किमान १४ जवान ठार, तर २०हून अधिक जण जखमी झाले. पाकिस्तानच्या लष्करी सैनिकांच्या तुकडीवर हा हल्ला करण्यात आला होता.
उत्तर वजिरीस्तान प्रांतातील मीरनशाह शहरात हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात होता हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, तेहरीक ए तालिबान या संस्थेचा प्रणेता हकीमुल्ला मेहसूद याने अतिरेक्यांनी पाक लष्करावर हल्ले करू नयेत, असे सांगितल्यानंतर हा हल्ला झाला आहे.
पाक लष्करावरील हल्ले थांबवा
पाकिस्तानातील तालिबानी संघटनेचा म्होरक्या हकीमुल्ला मेहसूद याने उत्तर वजिरीस्तान प्रांतातील अतिरेक्यांनी पाक लष्करावर हल्ले करू नयेत, उलट शेजारील अफगाणिस्तानात असलेल्या नाटो सैन्यावरच हल्ले करण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले आहे.
हाफीझ गुल बहादूर याने पाक शासनाला तेहरीक इ तालिबान पाकिस्तानच्या वतीने पाक लष्करावरील हल्ले थांबविण्याचा शब्द दिला होता, त्याचे पालन करावे, अशी सूचना मेहसूदने दिली.
मुजाहिद्दीन बंधूंनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानी मुल्ला ओमर याच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन जिहाद लढत आहेत, मात्र शत्रूंना आपले ऐक्य असल्याचे आपल्या कृतींमधून दिसत नाही, तेव्हा पाक लष्करावरील हल्ले थांबवा, अशा शब्दांत मेहसूद याने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा