Local Terrorists In Jammu And Kashmir: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. यानंतर गुप्तचर यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २० ते ४० वयोगटातील हे दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना हत्यारे आणि घुसखोरीसाठी सक्रियपणे मदत करत आहेत.
सुरक्षा यंत्रणांनी ओळख पटवलेले हे १४ दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या तीन प्रमुख पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. यापैकी आठ लष्कर-ए-तैयबा आणि प्रत्येकी तीन जैश-ए-मोहम्मदशी व हिज्बुल मुजाहिदीनशी संबंधित आहेत.
सुरक्षा यंत्रणांनी ओळख पटवलेल्या स्थानिक दहशतवाद्यांमध्ये आदिल रहमान डेंटू (२१), आसिफ अहमद शेख (२८), अहसान अहमद शेख (२३), हरीस नजीर (२०), आमिर नजीर वानी (२०), यावर अहमद भट, आसिफ अहमद खांडे (२४), नसीर अहमद वानी (२१), शाहिद अहमद कुटे (२७), अदबीर अहमद दारान (२७), जुबेर अहमद वानी (३९), हारून रशीद गनई (३२) आणि झाकीर अहमद गनी (२९) यांचा समावेश आहे. अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
आदिल रहमान डेंटू २०२१ मध्ये लष्कर-ए-तैयबामध्ये सहभागी झाला होता. तो या संघटनेचा सोपोर जिल्हा कमांडर म्हणून सक्रियपणे काम करत आहे. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आसिफ अहमद शेख हा अवंतीपोराचा जिल्हा कमांडर आहे आणि २०२२ पासून तो सतत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.
लष्कर-ए-तैयबाचा अहसान अहमद शेख पुलवामामध्ये सक्रिय आहे आणि २०२३ पासून तो सतत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. पुलवामाचा हरीस नजीर हा २०२३ पासून लष्कर-ए-तैयबामध्ये सक्रिय आहे तर आमिर नजीर वाणी हा पुलवामामध्ये २०२४ पासून जैश-ए-मोहम्मदशी संबंधित सक्रिय दहशतवादी आहे. यावर अहमद भट देखील पुलवामामध्ये पूर्णपणे सक्रिय आहे आणि २०२४ पासून जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे.
आसिफ अहमद खांडे हा जम्मू आणि काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील दहशतवादी आहे आणि तो जुलै २०१५ मध्ये हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला होता. तो सध्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे.
नसीर अहमद वाणी हा २०१९ पासून शोपियांमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा सक्रिय सदस्य आहे आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करत आहे. शोपियांमधील आणखी एक सक्रिय दहशतवादी शाहिद अहमद कुटे हा २०२३ पासून लष्कर-ए-तोयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंटशी संबंधित आहे.