Crime News : रेल्वे स्टेशनवर काहीतरी खायला आणण्यासाठी गेलेल्या वडिलांना शोधण्यासाठी रेल्वे डब्यातून खाली उतरलेल्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशमधील बरेली जंक्शन रेल्वे स्थानकावरील यार्डजवळ एका अज्ञात व्यक्तीने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीची प्रकृती लक्षात घेता रेल्वे पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची शक्यता देखील नाकारली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिचे कुटुंबिय हे उत्तराखंडमधील एका मंदिरात दर्शन घेऊन उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी परतत होते. जेव्हा रेल्वे बरेली जंक्शनवर पोहचली तेव्हा पीडित मुलीचे वडील पिण्याचे पाणी आणि खायला काहीतरी आणण्यासाठी रेल्वेतून खाली उतरले, पण गाडी स्टेशनवरून सुटण्याच्या आधी त्यांना रेल्वेत चढता आले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी काय सांगितलं?

बरेलीचे सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी)चे पोलिस अधीक्षक आशुतोष शुक्ला यांनी सांगितले की, “ट्रेन स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतरही मुलीला तिचे वडील डब्यात दिसले नाहीत, त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी तिने चालत्या ट्रेनमधून बाहेर उडी मारली. ती रेल्वे स्टेशनकडे चालत जात होती, तेव्हा काही अज्ञातांना स्टेशनच्या यार्डजवळ तिच्यावर बलात्कार केला. तिला गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

पोलिसांनी सांगितले की , मुलीने तिच्याबरोबर घडलेली घटना स्टेशनवरील रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर ते अधिकारी तिला जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले, जेथे गुरूवारी रात्री १० वाजता एफआयआर दाखल करण्यात आला.

आरोपींना शोधून काढण्यासाठी चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. आम्ही घटनास्थळी रात्री तपास केला तसेच फॉरेन्सिक टीमने काही नमूने गोळा केले आहेत. आम्ही त्यांना लवकरच अटक करू, असे एसपी शुक्ला म्हणाले.