१४ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. शुक्रवारी पहाटे काही स्थानिक नागरिकांनी पीडित मुलीचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. झारखंडमधील दुमका येथे ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक सुदर्शन मंडल यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं की, १४ वर्षीय आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अरमान अन्सारी नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा- अमरावतीतील आंतरधर्मीय प्रेमविवाह प्रकरणाला वेगळं वळण, प्रमाणपत्रावर काझीऐवजी मजुराने सही केल्याचं उघड

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलगी दुमका येथे आपल्या मावशीकडे वास्तव्याला होती. दरम्यान, तिची आरोपी अन्सारीशी ओळख झाली. त्यानंतर दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले. यातूनच पीडित मुलगी गरोदर राहिली. यानंतर तिनं अन्सारीकडे लग्न करण्याची मागणी केली. पण आरोपीनं तिची निर्घृण हत्या केली. पीडितेची आधी हत्या केली आणि मग आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला लटकवला का? हे तपासण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “दुमका येथे घडलेल्या घटनेनं मला खूप दु:ख झाले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश मी दुमका पोलिसांना दिले आहेत. मृत मुलीच्या आत्म्यास देव शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबाला हा कठीण काळ सहन करण्याची शक्ती देवो.”

Story img Loader