पीटीआय, काठमांडू 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपूर्वी ६.४ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. नेपाळच्या पश्चिम भागातील दुर्गम डोंगराळ प्रदेशात हा भूकंप झाला. त्यात आतापर्यंत सुमारे १४० नागरिक मृत्युमुखी पडले. सुमारे १५० जण जखमी झाले असून, शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. २०१५ नंतर नेपाळमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे. राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री ११ वाजून ४७ मिनिटांनी घडली. त्याचे केंद्र जाजरकोट जिल्ह्यात होते.

२०१५ मध्ये नेपाळमध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप आला होता. या दुर्घटनेत सुमारे नऊ हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते आणि २२ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले होते.  शुक्रवारचा हा भूकंप २०१५ नंतर देशात आलेला सर्वात विनाशकारी भूकंप आहे. या भूकंपाचे धक्के काठमांडू आणि आसपासच्या जिल्ह्यांसह भारतात दिल्लीतही जाणवले.

हेही वाचा >>>“…अन् यांनी ‘महादेव’ नावंही सोडलं नाही”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

 नेपाळ लष्कराचे प्रवक्ते कृष्णप्रसाद भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर लगेचच घटनास्थळी बचाव कार्य करण्यासाठी नेपाळ लष्कराने शुक्रवारी आपले जवान तैनात केले. सरकारी नेपाळ वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम जिल्ह्यांना भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे.   

राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर सुमारे १५९ भूकंपोत्तर धक्के बसले. भूकंपाच्या भीतीने आणि घरे कोसळण्याच्या शक्यतेने बहुसंख्य नागरिकांनी रात्र घराबाहेरच जागून काढली. समाजमाध्यमांवरील चित्रफितीत अनेक नागरिक अंधारात कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून अडकलेल्यांना बाहेर काढताना दिसत होते.

हेही वाचा >>>खळबळजनक! भर बैठकीत भाजपा नेत्याची निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार करत शरीराचे केले तुकडे

मोदींकडून दु:ख..

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्ता हानीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी ‘एक्स’वर नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांना ‘टॅग’ करून नमूद केले, की भारत आपल्या शेजारी देश नेपाळसह ठामपणे उभा आहे. या संकटात सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज आहे. नेपाळवासीयांना आवश्यक त्या सर्व बाबींची मदत केली जाईल. 

बिहारमध्ये जीवित-मालमत्ता हानी नाही

पाटणा : बिहारमधील अनेक जिल्ह्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. बिहार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. या विभागाने निवेदनात स्पष्ट केले आहे, की सुदैवाने राज्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. पाटणा, कटिहार, पूर्व-पश्चिम चंपारण, दरभंगा, मुझफ्फरपूर, सासाराम, नवादा आणि भारत-नेपाळ सीमेलगतच्या अन्य अनेक जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के  बसले.

झारखंडमध्येही धक्के

रांची :  झारखंडमधील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.  रांची हवामान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सुदैवाने राज्यात यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. शुक्रवारी रात्री रांची, हजारीबाग, गढवा, कोडरमा, रामगढ आणि राज्याच्या इतर काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 140 earthquake victims in nepal about 150 injured amy