पीटीआय, तिरुवनंतपुरम
केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलन झालेल्या भागातून आतापर्यंत १४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर १९१ नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. २१३ नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल असून, ५ हजार ५९२ नागरिकांना भूस्खलन झालेल्या ठिकाणाहून वाचवण्यात यश आले आहे. याशिवाय लहान मुले आणि गर्भवतींसह ८,०१७ नागरिकांना जिल्ह्यातील विविध ८२ मदत शिबिरांमध्ये स्थलांतरित केले असल्याचेही मुख्यमंत्री विजयन त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच शेकडो नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे मुंडक्काई, चूरलमला, अट्टामला आणि नूलपुझा गावात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यामध्ये महिला आणि मुलांसह अनेकांचा मृत्यू झाला. भूस्खलनात ३०० हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
मंगळवारी पहाटे २ ते ४.१० च्या या वेळेत भूस्खलन झाले. गाढ झोपेत असतानाच ही घटना घडल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यातून मृतांचा आकडा वाढला. बुधवारी सकाळी भूस्खलनाने उद्ध्वस्त झालेल्या मुंडक्काई गावात बचावकार्य सुरू करण्यात आले. या वेळी उद्ध्वस्त झालेल्या घरांमध्ये मृतदेह आढळली.दरम्यान, भीषण दुर्घटनेनंतर बेपत्ता नागरिकांची संख्या निश्चित करण्यासाठी वायनाड जिल्हा अधिकाऱ्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.