शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) या हानिकारक पदार्थाचे मोठे प्रमाण आढळल्यामुळे दिल्ली सरकारने मॅगी नूडल्सवर १५ दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय बुधवारी घेतला. दिल्ली सरकारने मॅगी नूडल्सचे १३ नमुने तपासले. त्यापैकी १० नमुने सदोष आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे दिल्लीच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी नेसले कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘बिग बाजार’ मॉल्समधूनही ‘मॅगी’ हद्दपार
रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य ‘फ्युचर ग्रुप’ने मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘फ्युचर ग्रुप’च्या अधिपत्याखाली असलेल्या देशभरातील ‘बिग बाजार’, ‘निलगिरी सुपरमार्केट’ आणि ‘इजी-डे’ या सर्व रिटेल मॉल्समधून मॅगी हद्दपार होणार आहे. ‘मॅगी’च्या नमुन्यात हानिकारक पदार्थांचे प्रमाण आढळून आल्याने सुरू असलेला वाद आणि ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन मॅगीची विक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘फ्युचर ग्रुप’च्या वतीने सांगण्यात आले आहे. देशभरातील तब्बल २५९ शहरांमध्ये असलेल्या ‘बिग बाजार’च्या सर्व आऊटलेट्समधून मॅगीची विक्री बंद होणार आहे. ‘फ्युचर ग्रुप’सारख्या रिटेल क्षेत्रातील मोठ्या कंपनीने घेतलेला हा निर्णय मॅगीचे उत्पादन करणाऱया नेसले कंपनीसाठी मोठा धक्का ठरणार आहे.
दोन वर्षांपूर्वीच मॅगीची जाहिरात सोडली
दोन वर्षांपूर्वीच आपण मॅगीची जाहिरात करणे सोडल्याचे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले. मॅगीशी आता आपला कोणताही संबंध नसून, मला अद्याप तरी याप्रकरणात कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझे वकील यासंबंधीची माहिती घेत असल्याचेही ते म्हणाले.
मुझफ्फरपूरमधील न्यायालयाने नेसले कंपनीचे अधिकारी आणि उत्पादनाची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली.
केरळ राज्य शासनानेही राज्यातील सरकारी दुकानांमध्ये ‘मॅगी’च्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा