रेमल चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील मिझोराम राज्यालाही बसला आहे. मिझोरामच्या आइजोल जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात १५ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर दरड कोसळून ११ जण त्याखाली फसले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, आज सकाळी ११.१५ वाजता मृतांची संख्या निश्चित करण्यात आली. आइजोल जिल्ह्यातील मेलथून आणि इतर भागातून ११ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. इतर मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितले की, बचाव कार्यासाठी आम्ही १५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसेच मृतांच्या नातेवाईकांना आजच मदत जाहीर केली जाणार आहे. राज्यात वादळाचा तडाखा आता ओसरत आहे. पण सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे माहिती गोळा करणे कठीण जात आहे. राज्य सरारने मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये सानुग्राह अनुदान मंजूर केले आहे.
राज्यातील प्रतिकूल हवामानामुळे, राज्य सरकारने सर्व शाळा, बँका, वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अत्यावश्यक सेवा देणारी सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असेही आवाहन सरकारने केले आहे.
‘रेमल’ चक्रीवादळाचे नवे संकट! मान्सूनसह महाराष्ट्रावर काय परिणाम होणार जाणून घ्या
मिझोरामशिवाय ईशान्य भारतातील आसाम, मेघालय या राज्यांनाही वादळाचा तडाखा बसला आहे. आसाममधील हाफलांग आणि सिलचर दरम्यानचा रस्ता वादळामुळे वाहून गेल्यामुळे दळणवळण विस्कळित झाले आहे.
रेमल चक्रीवादळाने पश्चिम बंगालच्या दक्षिण किनारपट्टी भागात थैमान घातले. येथील २४ विभाग, ७९ पालिका प्रभागांतील सुमारे १५ हजार घरांचे ‘रेमल’ चक्रीवादळाने नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. या वादळामुळे २ हजार १४० वृक्ष तसेच ३३७ विजेचे खांब कोसळल्याचेही त्यांनी सांगितले. वादळग्रस्त भागात सरकारी कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला दिली.