पीटीआय, इम्फाळ
पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात नव्याने उसळलेल्या हिंसाचारात १५ घरे पेटवण्यात आली. शनिवारी सायंकाळी बेफाम जमावाने लांगोल खेडय़ातील घरांना आग लावली. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या.
हिंसाचारात ४५ वर्षांच्या एका व्यक्तीला गोळय़ा घालण्यात आल्या.
त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. रविवारी सकाळी या ठिकाणच्या परिस्थितीत सुधारणा झाली असली, तरी निर्बंध अद्याप लागू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.इम्फाळ पूर्व जिल्ह्याच्या चेकोन भागातही नव्याने हिंसाचार झाल्याचे वृत्त असून, शनिवारी येथील एक मोठय़ा व्यावसायिक आस्थापनेला आग लावण्यात आली.
बंदच्या काळातही जाळपोळ
२७ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय समितीच्या आवाहनावरून पाळण्यात आलेल्या २४ तासांच्या बंददरम्यान हिंसाचाराच्या या घटना घडल्या. या बंदमुळे शनिवारी इम्फाळ खोऱ्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते.