आफ्रिकेमधील सोमालिया देशाच्या किनाऱ्यालगत एका मालवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आले आहे. या जहाजावर १५ भारतीय सदस्य काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. अपहरण झाल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने बचावाची तयारी केली असून नौदलाच्या विमानांकडून अपहृत जहाजाच्या आसपासच्या भागाचे निरीक्षण केले आहे. अपहृत जहाजाशी संपर्क साधला गेला असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपहृत जहाजाने गुरुवारी रात्री पाच ते सहा शस्त्रधारी हल्लेखोर जहाजावर आले असल्याचा संदेश नौदलाला पाठविला होता. लायबेरियाचा झेंडा असलेले “एमव्ही लीला नॉरफोक” हे मालवाहू जहाज अरबी समुद्रातून जात असताना त्यावर हल्ला झाला. जहाजाचा संदेश प्राप्त झाल्यानंतर आयएनएस चेन्नई ही युद्धनौका रवाना करण्यात आली. तसेच नौदलाच्या विमानांनी जहाजाची पाहणी केली असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार परिस्थितीचे आकलन केले जात आहे.
हे वाचा >> गुजरातच्या समुद्रकिनारी जहाजावर ड्रोन हल्ला, हमास-इस्रायल युद्धाचा संबंध काय? जाणून घ्या..
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मालवाहू जहाजांवरील हल्ले वाढले आहेत. २३ डिसेंबर रोजी अरबी समुद्राच्या पोरबंदर किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या एका वाणिज्य जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या जहाजावर २१ भारतीय नागरिक कर्मचारी होते.