Archaeological Survey of India (ASI)च्या अहवालानुसार ज्ञानवापी मशीद परिसरात हिंदू मंदिर होतं ही बाब समोर आली आहे. ज्ञानवापी मशीद १७ व्या शतकात बांधण्यात आली. मात्र त्याआधी तिथे मंदिर होतं असं ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याच्या अहवालात म्हटलं आहे. या संबंधी ASI ने जे सर्वेक्षण केलं त्याचा ८३९ पानी अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. या अहवालात ASI शिवलिंगं सापडल्याचा दावा केला आहे.
मशिदीच्या आतल्या भागात काय सापडलं? काय सांगतो अहवाल?
१५ शिवलिंग तुटलेल्या अवस्थेत मिळाली
हनुमानाच्या पाच मूर्ती मिळाल्या
विष्णूची तीन शिल्पं
दोन कृष्णाची शिल्पं
तीन गणपतीच्या मूर्ती
दोन नंदीची शिल्पं
ज्ञानवापी मशीद परिसरात या सगळ्या गोष्टी आढळून आल्याचं ASI चा अहवाल सांगतो आहे. त्यासाठी ASI ने या संबंधीचे फोटोही अहवालात जोडले आहेत. तसंच फोटोंमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे खांबांवर स्वस्तिक कोरण्यात आलं आहे. ज्ञानवापीचा हा एएसआयने सादर केलेला अहवाल सांगतो आहे की मशीद बांधण्यापूर्वी या ठिकाणी शंकराचं मंदिर होतं. ते उद्ध्वस्त करुन या ठिकाणी मशीद बांधण्यात आली.
वकील हरी शंकर जैन यांनी काय सांगितलं?
अॅडव्होकेट हरी शंकर जैन यांनी सांगितलं की मशीद परिसरात आणि काही भागांमध्ये काही मूर्ती भग्नावस्थेत सापडल्या. औरंगजेबाने जाणीवपूर्वक या मूर्ती तोडल्या होत्या. त्या सापडल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच हिंदू देव-देवतांची चित्रं भिंतींवर कोरल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
आणखी काय पुरावा हवा आहे?
ग्यानवापीचा अहवाल मी पूर्ण वाचलेला नाही. मात्र ज्या गोष्टी समोर आल्या त्या पुरावा म्हणून पुरेशा आहेत. हिंदू मंदिर तोडून मशीद बांधण्यात आली आहे. तसंच इथे पश्चिमेला जी भिंत आहे ती पाच हजार वर्षांपूर्वीची आहे, तसंच ती हिंदू मंदिराची आहे. त्यावर हिंदू देव-देवतांच्या आकृती कोरलेल्या आहेत. तसंच भिंतीवर तेलुगु आणि कन्नड भाषेतले श्लोक आहेत. एक शिलालेख मिळाला आहे. त्यात औरंगजेबाने मंदिर तोडून मशीद बांधल्याचं म्हटलं आहे. यापेक्षा अजून काय पुरावा हवा? असंही जैन यांनी विचारलं आहे.
वाराणसी जिल्हा न्यायालयात १८ डिसेंबर रोजी सीलबंद लिफाफ्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केलेला अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातील निष्कर्षांचा अभ्यास दोन्ही पक्षकारांना करण्याची संधी मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन या अहवालातील काही महत्त्वाच्या मुद्दयांची माहिती दिली. ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर पूर्वी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्त्वात होते, असे अहवालात नमूद असल्याचा दावा जैन यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर आता यातल्या या गोष्टी समोर आल्या आहेत.
हे पण वाचा- ज्ञानवापी प्रकरण : प्रार्थनास्थळांवरील कायदा अन् त्याच्या समोरील आव्हाने
वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, महामुक्ती मंडप असा शब्द लिहिलेला एक शिलालेख मशिदीच्या आवारात सापडला आहे. हा अतिशय महत्त्वाच शब्द असल्याचे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. सर्वेक्षणाच्या दरम्यान शिलालेखाच्या दगडाचे तुकडे मिळाले आहेत. या शिलालेखाचे इतर तुकडे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आधीपासूनच आहेत, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
हिंदू पक्षाने हा दावा केला आहे की ८३९ पानी जो अहवाल आहे तो अहवाल आणि समोर आलेले फोटो हाच सर्वात मोठा पुरावा आहे जो सांगतोय की ज्ञानवापी मशीद बांधण्यापूर्वी तिथे हिंदू मंदिर होतं.