जम्मू-काश्मीरमधील नारबल येथे फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्या अटकेच्या निषेधार्थ उसळलेल्या हिंसाचारात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पोलीसांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जमावाने पोलीसांच्या सुरक्षाव्यवस्थेचे उल्लंघन केल्यामुळेच हा प्रकार घडल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीसांकडून सांगण्यात आले. पोलीसांनी याप्रकरणी मागम या स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
येथील मगम परिसरात शनिवारी सकाळी जोरदार दगडफेक सुरू असल्याचे समजल्यानंतर राज्य आणि संसदीय पोलीसांचे एक पथक येथे दाखल झाले. तेव्हा त्यांना जमावाच्या जोरदार हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांच्या पथकाकडून हवेत गोळ्यांच्या काही फैरी झाडण्यात आल्या. दुर्देवाने यामध्ये सुहेल अहमद हा तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली.
पोलीसांनी युवकाच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त करताना आंदोलकांवर गोळीबार करण्यास नक्की कोणी सुरूवात केली, याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सकाळपासून सुरू असलेल्या या हिंसाचारात आत्तापर्यंत सहाजण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानचा झेंडा फडकावत भारतविरोधी घोषणाबाजी करणा-या मसरत आलमला अटक करून शुक्रवारी रात्री त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात आलमच्या अटकेचे तीव्र पडसाद खोऱ्यात उमटत आहेत. 

Story img Loader