उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझीपूर येथे मंगळवारी एका १५ वर्षाला मुलाला अटक करण्यात आली. या अल्पवयीन मुलाच्या प्रेमसंबंधाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे सदर मुलाने आई-वडील आणइ सख्ख्या भावाचा निर्घृण केला. गाझीपूर जिल्ह्यातील नंदगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कुसुम्हीकला या गावात ही धक्कादायक घटना घडली. अल्पवयीन मुलाचे दोन वर्षांपासून एका मुलीवर प्रेम होते. तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी घरच्यांनी विरोध केल्यामुळे त्या संतापासून अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपूर्ण कुटुंब संपविले.
गाझीपूरचे पोलीस अधीक्षक ओमवीर सिंह यांनी सांगतिले की, अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तसेच त्याने खून करण्यासाठी वापरलेले धारदार शस्त्रही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने वडील मुंशी बिंद (४५), आई देवंती बिंद (४०) आणि मोठा भाऊ रामआशिष बिंद (२०) यांची निर्घृणपणे हत्या केली.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून तो सदर गुन्हा करण्यासाठी तयारी करत होता. यासाठी त्याने खुरपे (शेतात पिक कापणीसाठी वापरले जाणारे हत्यार) घरी आणून ठेवले होते. तसेच खुरप्याला धारही काढून ठेवली होती. ७ जुलै रोजीच कुटुंबाला संपविण्याचा विचार आरोपीने केला होता. मात्र त्यादिवशी त्याची हिंमत झाली नाही. मग दुसऱ्याच दिवशी ८ जुलै रोजी त्याने हे कृत्य केले.
रविवारी (७ जुलै) रात्री आरोपी आपला भाऊ रामआशिषसह गावात ऑर्केस्ट्रा पाहायला गेले होते. रात्री ११ वाजता दोघे घरी परतले. रात्री घरातले सर्व लोक झोपल्यानंतर आरोपीने मद्यप्राशन केले आणि त्यानंतर आई, वडील आणि भावाचा गळा चिरून खून केला. जन्मदात्यांचा खून केल्यानंतर आरोपीने घराशेजारी असलेल्या शेतात जाऊन खुरपे लपवले आणि पुन्हा एकदा गावातील ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी जाऊन बसला.
उत्तर प्रदेशात भीषण अपघात; दुधाच्या कंटेनरला बसची धडक, १८ प्रवाशांचा मृत्यू!
रात्री दोन वाजता तो पुन्हा घरी परतला आणि घरातल्या लोकांचा खून झाल्याचा कांगावा करू लागला. दुसऱ्या दिवशी आरोपीचे काका रामप्रकाश बिंद यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूनाचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करत सखोल चौकशी केली. गावातील लोकांचे जबाब, प्रत्यक्ष पुरावे गोळा केल्यानंतर त्यांना अल्पवयीन मुलावर संशय आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता मुलाने आपला गुन्हा मान्य केला.
© IE Online Media Services (P) Ltd